तळोजा परिसरातील विद्यार्थ्यांनी कलात्मकतेच्या माध्यमातून साकारली रंगांची उधळण; शोएब सुर्वे यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला दाद
तळोजा – सक्सेस एज्युकेशन सोसायटी, तळोजा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट स्पर्धेला तळोजा परिसरातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शाळांमधून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर रंग आणि हस्तकलेच्या माध्यमातून अप्रतिम सादरीकरण केले.
या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी करण्यात आले होते. रंगीबेरंगी चित्रे, विविध प्रकारच्या क्राफ्ट कलाकृती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सक्सेस एज्युकेशन सोसायटीचे संचालक शोएब सुर्वे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी ज्या आत्मविश्वासाने सहभाग घेतला, तो निश्चितच प्रेरणादायक आहे.”

या कार्यक्रमांना पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आयोजकांचे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.