भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे, त्यातील पहिला सामना धर्मशाला येथे खेळवला जात आहे. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे आधीच या मालिकेतून बाहेर आहे, त्याच्या बदलीची घोषणा झालेली नाही. दरम्यान, निवड समितीने मोठा निर्णय घेतला असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणाला चेन्नईत होणाऱ्या तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियामध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी हर्षित राणाला चेन्नईमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेपूर्वी संघात सामील होण्यास सांगितले आहे. वृत्तानुसार, हर्षित हा हार्दिक पांड्याऐवजी संघात सामील होणार नाही, मात्र राणाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वातावरणाशी जुळवून घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे राणा T20 विश्वचषक खेळू शकला नाही, तो आयपीएल 2026 मध्येही खेळला नाही.
बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, “संघ व्यवस्थापनाने हर्षित राणाला एकदिवसीय मालिकेपूर्वी संघात सामील होण्याची संधी दिली होती, परंतु त्याला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये अधिक सरावाची गरज असल्याचे ठरवण्यात आले. तो दररोज 9 ते 10 षटके गोलंदाजी करत आहे.”
तो पुढे म्हणाला, “राणा त्याच्या फलंदाजीवरही मेहनत घेत आहे. 17 जून रोजी त्याला सीओईकडून खेळण्यासाठी अधिकृत मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर तो चेन्नईला रवाना होईल.”
हर्षित राणा आयर्लंड दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. निवडकर्त्यांनी आयर्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या T20 मालिकेत आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत त्याचा समावेश केला आहे.











