बुधवार व गुरुवारी द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर आणि तळोजा सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद राहील.
नवी मुंबई – हेटवणे धरण जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल-दुरुस्तीचे काम सिडको महामंडळाने स्वीकारल्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा या सिडको क्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहील. यामुळे सिडको क्षेत्रातील रहिवाशांनी पाण्याची साठवणूक करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.
खारघर व तळोजा ह्या क्षेत्रातली सध्या पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळत नसताना गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशी पाण्याचे टँकर खरेदी करून तहान भागवत आहेत. उन्हाळ्यामध्ये रहिवाशांच्या अंगाची लाही लाही होत असतानाच अपु-या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सिडको मंडळाने पाणी गळती रोखण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
बुधवारी व गुरुवारच्या कामामध्ये डीएफसीसी कॉरीडाडमध्ये जलवाहिनीमध्ये बदल करणे आणि पाच ठिकाणी जलवाहिनीतील पाणी गळती रोखण्याचे काम सिडको मंडळाने हाती घेतले आहे. काही प्रमाणात का होईना, रहिवाशांना पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिडकोचे हे प्रयत्न सुरू आहेत.
सिडको महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये हेटवणे धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य जलवाहिनीवर नियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. हे काम बुधवारी (ता. ९) सकाळी सहा वाजेपासून गुरुवारी (ता. १०) सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. त्यानंतर पुढील शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत (२४ तास) पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होणार असल्याने रहिवाशांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सिडको प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.