IPL 2026 मधील लीग टप्पा संपला आहे. 70 सामन्यांनंतर आता प्लेऑफच्या थराराची पाळी आहे. रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (RR) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची कामगिरी दमदार होती. या सामन्यात 3 विकेट्स घेत आर्चर पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 3 मध्ये सामील झाला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आर्चरने 4 षटकात 17 धावा देत 3 बळी घेतले. आयपीएल 2026 मध्ये, आर्चरने आता 14 सामन्यांमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत आणि या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसरा आला आहे. आर्चरने चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज अंशुल कंबोजला मागे टाकले आहे.
मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे पर्पल कॅप कायम आहे. भुवनेश्वरने 14 सामन्यात 24 विकेट घेतल्या आहेत. गुजरात टायटन्सचा गोलंदाज कागिसो रबाडा २४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, राशिद खान 14 सामन्यांत 19 बळी घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्सचा सलामीचा फलंदाज साई सुदर्शनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. सुदर्शनने 14 सामन्यांमध्ये 157 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 638 धावा केल्या आहेत. सुदर्शनचा साथीदार आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल 13 सामन्यात 616 धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे.
या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज केएल राहुल 14 सामन्यात 593 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने 60 धावांची दमदार खेळी केली. राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी ५८३ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.










