पहिल्याच दिवशी रस्ता अडविणाऱ्या चालकांवर सहा फौजदारी गुन्हे दाखल,कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस सरसावले

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील सेवा रस्त्यावर तीन रांगेत अवजड वाहने उभी करुन हलक्या वाहनांची वाट रोखणा-या वाहनचालकांविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे सत्र गुरुवारपासून पुन्हा एकदा वाहतूक पोलीसांनी सूरु केले आहे. पहिल्याच दिवशी ६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम किती दिवस चालवून वाहनचालकांना शिस्त लागतेय का याकडे हलक्या वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. 

मागील १७ महिन्यांत पोलीस अधिकारी बानकर व त्यांच्या पथकाने दंडात्मक कारवाईतून सव्वा कोटी रुपयांचा महसूल नवी मुंबई पोलीसांच्या तिजोरीत जमा केला होता. मात्र याच पोलीसांनी रहदारीस अडथळा करणा-या वाहनचालकांवर अवघे ७ गुन्हे नोंदवले होते. यापूर्वीचे या विभागाचे पोलीस अधिकारी निशिकांत विश्वकार यांनी काही दिवसात ५८ गुन्हे नोंदवून १८९ चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे पोलीसांची कारवाई का थंडावली असा प्रश्न लोकसत्ताने विचारल्यावर पोलीसांच्या कारवाईची सूरुवात गुरुवारी वाहतूक पोलीसांनी केली. 

पहिल्याच दिवशी कारवाई केल्यावर पोलीसांची मोहीम पुन्हा थांबते की शिस्त लागेपर्यंत सातत्याने फौजदारी कारवाई सूरु ठेवली जाते, याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे सहकार्य या कारवाईत मिळणे अपेक्षित असल्याचे दबक्या आवाजात वाहतूक पोलीसांकडून बोलले जात आहे. वाहतूक पोलीसांना रस्ता अडविलेल्या वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनाम्याचे कागदपत्र तयार करुन कळंबोली पोलीस ठाण्यात फीर्याद द्यावी लागते. न्यायालयात जाऊन जोपर्यंत चालकाला दंड होत नाही तोपर्यंत चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना स्थानिक पोलीसांकडे जमा राहतो. दररोज जास्तीत जास्त फौजदारी गुन्हे स्थानिक कळंबोली पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी संयुक्त पथक स्थापन करुन केल्यास चालकांना शिस्त लागेल.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी रोडपाली सिग्नल, नावडे फाटा, कळंबोली सर्कल, कळंबोली लोखंड बाजार, खारघर, खांदेश्वर आणि कामोठे या वसाहतींच्या प्रवेशव्दारावर सकाळी व सायंकाळच्या वेळी वाहतूकीचा आढावा घ्यावा अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईतील वाहतूकीवर नियंत्रणासाठी वेगवेगळे पोलीस ठाणे आणि स्वतंत्र पोलीस उपायुक्तांची नेमणूक केली आहे. परंतू बडे अधिकारी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरत नसल्याने नागरिकांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त भारंबे यांची आठवण होत आहे.

गुरुवारी कळंबोली वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक उपनिरिक्षक उत्तम कोरे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक साठे, पोलीस हवालदार जाधव, मांढरे यांच्या पथकाने लोखंड पोलाद बाजारातील रस्ता अडवून उभ्या केलेल्या बेकायदा वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २८५ अंतर्गत दिलीप जैसवाल, दीपक यादव, मनोज जैसवाल, संतोषकुमार यादव, चंद्रकांत व्दिवेदी, मोहम्मद मुस्तफा मंजुर शेख यांच्यावर फौजदारी कारवाई केली.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *