Skip to main content

mynavimumbai


वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारच्या १० विकेट्स आणि साई सुदर्शनच्या शानदार शतकाच्या जोरावर भारत अ संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटीत श्रीलंका अ संघाचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंका संघावर पूर्णपणे वर्चस्व राखले. भारतीय संघाला चौथ्या डावात विजयासाठी केवळ 33 धावांची गरज होती. टीम इंडियाने कोणतेही नुकसान न करता 36 धावा केल्या आणि 10 गडी राखून सामना जिंकला. गुरनूर ब्रारने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारत अ संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंका अ संघाने कर्णधार सहान अरचिगेच्या 127 धावांच्या जोरावर 366 धावा केल्या. भारताकडून गुरनूर ब्रार आणि सरांश जैन यांनी 4-4 विकेट घेतल्या. तर यश ठाकूरने 2 बळी घेतले.

भारतीय संघाने साई सुदर्शनच्या 168 धावा, देवदत्त पडिकलच्या 94 धावा, सरांश जैनच्या 70 धावा आणि कर्णधार ध्रुव जुरेलच्या 53 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 543 धावा करत श्रीलंका संघावर 177 धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेकडून केशर नुवंताने सर्वाधिक 5 बळी घेतले.

श्रीलंकेचा दुसरा डाव 209 धावांवर आटोपला. अशेन बंदाराने सर्वाधिक 87 धावांची खेळी खेळली. भारताकडून गुरनूर ब्रारने 6, सरांश जैनने 2, तर आकिब नबी आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

विजयासाठी 33 धावांचे लक्ष्य भारतीय अ संघाने 6.2 षटकात बिनबाद 36 धावा करत 10 गडी राखून सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने मालिका जिंकली आहे. मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली.

भारताचा मुख्य संघ ऑगस्टमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. ध्रुव जुरेल, साई सुदर्शन आणि गुरनूर ब्रार या खेळाडूंचा वरिष्ठ संघात समावेश होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, श्रीलंका अ विरुद्धच्या मालिकेतून मिळालेला अनुभव टीम इंडियासाठी (सीनियर) उपयुक्त ठरेल.

हेही वाचा-

टीम इंडियाला एकहाती पराभूत करणाऱ्या जेकब बेथेलने इंग्लंडच्या विजयावर दिलं मोठं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *