२२ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी चालक अटकेत; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल
नवी मुंबईतील एका नामांकित शाळेबाहेर सोमवारी सकाळी शेकडो संतप्त पालकांनी जोरदार निदर्शने केली. शाळेच्या व्हॅन चालकाने एका चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर, पालकांनी शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली.
ही धक्कादायक घटना २२ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणात एनआरआय कोस्टल पोलिसांनी शाळेच्या व्हॅन चालकाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी झालेल्या आंदोलनात पालकांनी हातात फलक घेऊन आणि घोषणा देत शाळेच्या मुख्याध्यापकाला बडतर्फ करण्याची मागणी केली. अनेक पालकांनी निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या होत्या.
माध्यमांशी बोलताना एका पालकाने शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप करताना सांगितले, “या गंभीर प्रकरणाबाबत त्यांचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी कोणतेही समाधानकारक आश्वासन दिलेले नाही. आम्ही आमच्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत कसे खात्री बाळगू?”
स्थानिक माध्यमांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
ही घटना उघडकीस आली तेव्हा पीडित मुलाने गुप्तांगाच्या ठिकाणी वेदना जाणवू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मुलाच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना संपर्क साधत या घटनेची माहिती दिली.
यानंतर शाळेने सर्व पालकांना व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती दिली की, पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून शाळा प्रशासन यासंबंधी चौकशी यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे.
“शाळा अंतर्गत चौकशी करत आहे आणि तपास यंत्रणांना सहकार्य करत आहे. या पार्श्वभूमीवर, शाळा सर्व पालकांना खात्री देते की आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे संदेशात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शाळेतील वाहतूक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पालक आता अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.