आचारसंहिता लागू झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकमुक्त

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत शहर फलकमुक्त करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. आचारसंहिता केव्हाही लागेल यामुळे नवरात्रोत्सवापासून शहरात फलकबाजीला ऊत आला होता. परंतु, आता याला आळा बसणार आहे. महापालिका आयुक्तांनी परिमंडळ एकसाठी अमोल पालवे तर परिमंडळ दोनसाठी प्रबोधन मवाडे या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी दिली आहे.
मागील काही दिवसापासून सर्वच राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी फलबाजीतून शहर विद्रुप करुन ठेवले होते. आघाडी, युती, महाआघाडी अशा सर्वच राजकीय आघाड्यांवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरात पक्षीय मेळावे, सभांच्या आयोजनातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात झाली होती. त्याचबरोबर फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातून फुकटी फलकबाजी बोकाळत असून शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र होते. परंतु आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरात ७२ तासांत शहर फलकमुक्त करावे लागणार आहे.

नवी मुंबई शहरात चौकाचौकांत फुकट्या बॅनरबाजीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत पालिकेच्या सर्वच विभागातील चौकांचे विद्रुपीकरण होत असताना पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातही मागील काही दिवसांपासून आचारसंहिता लागण्यापूर्वीच विविध विभागात व विविध राजकीय पक्षांमार्फत मेळावे व सभांना सुरवात झाली होती. त्यामुळे त्यानिमित्ताने शहरभर कार्यक्रमांचा व मेळावे व सभांचा धडाका सुरु होता. त्यामुळे शहरात विविध चौकाचौकांत झळकणारी बॅनरबाजी तर पामबीच मार्गावरही मोठ्या प्रमाणात फलकबाजी पाहायला मिळत होती. फलक लावताना नियमावली असून फलकाच्या आकारानुसार दरआकारणी होणे गरजेचे आहे. परंतू असे होताना दिसत नाही. तसेच पालिका विभाग अधिकारी कार्यालयाअंतर्गत व महापालिका अतिक्रमण विभागामार्फत अशा फुकट्या फलकबाजीवर कारवाई होताना दिसत नव्हती. काही वेळा फलक तुटून दुभाजकांमधील झाडांनाही इजा करत होते पण पालिकेचे याकडे दुर्लक्ष नव्हते.

पामबीच मार्गावर तसेच या मार्गावरील विविध चौकांत फलकबाजी पाहायला मिळत असून रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांवरही असलेल्या ठिकाणी फलक लावतात. परंतु, यातील अनेक फलक रस्त्यावर पडतात, खाली दुभाजकांमधील रोपट्यांवर पडतात व त्यांचे नुकसान होते. चौकाचौकांत लावलेल्या फलकामुळे वाहनचालकांनाही रात्रीच्यावेळीही अडथळा निर्माण होतो.

फलकांवर कारवाई तीन टप्प्यांत

आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासांत शासकीय इमारतीवरील फलक काढण्यात तसेच झाकण्यात येणार आहेत. ४८ तासांत शहरातील सार्वजनिक इमारती, सार्वजनिक जागा या ठिकाणचे फलक काढण्यात येणार आहेत. तर ७२ तासात खासगी इमारतींवर लावलेले फलक काढण्यात येणार आहेत.

शहरातील फलकबाजी करण्याबाबत उच्च न्यायालयाने नियमावली घालून दिलेली आहे. परंतू प्रशासन व राजकारणी यांची मिलीभगत असल्यानेच फलक लावण्याचे नियम पायदळी तुडवून हवे तसे, हवे तिथे फलक लावले जातात. शहर विद्रुपीकरणाला पालिकाच खतपाणी घालते. परंतू पालिकेने आचारसंहिता लागू झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा नियमितपणे कारवाई करणे आवश्यक आहे. -संदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास सुरुवात केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
Pocket
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *