शहरात सध्या होर्डिंग पॉलिसीला हरताळ फासून कोणत्याही रस्त्यावर, कोणत्याही चौकात, नाल्यांशेजारी, ओसी नसलेल्या इमारतींवर होर्डिंग, जाहिरातफलक वाट्टेल तसे लावलेले दिसत आहेत. होर्डिंग पॉलिसीनुसार मैदाने, क्रीडांगणे, बगिच्यांसह दोन किंवा अधिक रस्ते एकत्र येतात, त्यांच्या पोचमार्गापासून २५ मीटरच्या आत आता होर्डिंग उभारता येत नाहीत. मात्र, नवी मुंबईत याचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे.
घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जाहिरातफलक, होर्डिंग, निऑन चिन्हे आणि ग्लो साइन बोर्डचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती संकलित करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या सर्वेक्षणानंतर अशा बेलगाम जाहिरातबाजीला लगाम बसून महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नियमावलीस बिनधास्त दिली जाते तिलांजली- रस्त्यांच्या पृष्ठभागापासून ४० फूट अधिक उंचीच्या जाहिरात फलकांना मनाई आहे.- पदपथांवर आणि सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही जाहिरात फलकांना मनाई केली आहे. यामुळे वाढदिवसाचे बॅनर, होर्डिंगला आळा बसणार आहे.- निऑन फलक रात्री १० नंतर बंद करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमावलीस तिलांजली दिसल्याचे दिसते.- भित्तीचित्रणाद्वारे जाहिरातबाजीला मनाई आहे.
स्थैर्यता प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींवर जाहिरातींस बंदी घातली आहे.सीआरझेडला हरताळपाम मार्गावरील प्रत्येक चौक, रस्ता दुभाजकावर विद्युत रोषणाईची होर्डिंग दिसतात.वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अभ्युदय बँक चौक अरेंजा सर्कल, कोपरखैरणेतील डी मार्ट चौक, तुर्भेतील अन्नपूर्णा चौक, शहरातील सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल, ठाणे-वाशी रेल्वे मार्गावरील पूल, शहरातील ओसी नसलेल्या इमारती, वाशी, ऐरोली-मुलुंड खाडी पुलाजवळ सीआरझेडला हरताळ फासलेला दिसतो.
बेकायदा फलकबाजीला आवर घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने उत्सव सुरू होण्यापूर्वीच नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम २४४ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका आकाश-चिन्हे जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण २०२२ नुसार महापालिकेची आगाऊ लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच या परवानगीविना फलकबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार साहाय्यक पालिका आयुक्त तसेच विभाग अधिकाऱ्यांना बहाल केले होते, परंतु सध्या शहरभर जागा मिळेल तेथे लावण्यात आलेल्या फलकांकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नसल्याचे चित्र दिसत आहे.