सिडकोच्या पणन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या भूखंड विक्री योजना क्रमांक ४० अन्वये नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये असलेल्या विविध आकाराच्या आणि वापराच्या ४७ भूखंडांसाठी प्रस्ताव मागविले होते.
यात फक्त खारघर नोडमधील २० भूखंडांचा समावेश होता. त्यापाठोपाठ घणसाेली नोडमधील १० भूखंड होते. निवासी, निवासी आणि वाणिज्यिक तसेच फक्त वाणिज्यिक वापराचे हे भूखंड होते. यात लहान आकाराचे बंगलो प्लॉटचा सुद्धा समावेश होता.- नुकताच या योजनेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ४७ पैकी फक्त १५ भूखंडांना ग्राहकांनी प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ३२ भूखंडांसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.- या भूखंडांचे दर अधिक असल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अगोदरच घरे विकली जात नाहीत. आता भूखंडांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोसमोरचा पेच वाढला आहे.
सिडकोची हजारो घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून असून, ती विकण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले असतानाच सिडकोच्या भूखंडांनाही फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.