Navi Mumbai CIDCO Lottery: सिडकोचे अध्यक्ष सात ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा करणार असल्याचे बोलले जाते. २६ हजार घरांच्या सोडतीकरिता सिडको इच्छुकांकडून नोंदणी अर्ज प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांचे बॅण्डिंग, मार्केटिंग व विक्री दोन वर्षांपूर्वी नियुक्त केलेल्या ७०० कोटी खर्चाच्या वादग्रस्त सल्लागार कंपनीमार्फत करण्यावर सिडको संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत शिक्कामार्तब करण्यात आले. त्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर सिडको २६ हजार घरांची सोडत काढण्यास सज्ज झाली आहे.
सिडकोचे अध्यक्ष सात ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा करणार असल्याचे बोलले जाते. २६ हजार घरांच्या सोडतीकरिता सिडको इच्छुकांकडून नोंदणी अर्ज मागविण्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. नोंदणी झालेल्या अर्जदारांचे आवश्यक कागदपत्रे (केवायसी डॉक्युमेंट) तपासल्यानंतर पात्र अर्जदारांमध्ये घरांची सोडत काढली जाणार आहे. या गृह योजनेत खरेदीदारास १० ते १२ घरांचा प्राधान्यक्रम देऊन घरनोंदणी करता येणार आहे. सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांच्या विक्रीकरिता सल्लागार कंपनीच्या नियुक्तीसाठी सिडकोने निविदा प्रक्रिया राबवून मे. थॉटट्रेन्स डिझाइन्स प्रा. लि. व हेलिओसमेडियम बाजार प्रा. लि. या संयुक्त भागीदारीतील कंपनीला ६९९ कोटी ३ लाख ८४ हजार रुपये दराने काम दिले होते. याचा कार्यादेश सिडकोने ३० जून २०२२ रोजी संबंधित सल्लागार कंपनीस दिला आहे.
सल्लागार कंपनी व सिडको यांच्यात झालेल्या करारानुसार ४० टक्के रक्कम मोबिलायझेशन कॉस्ट म्हणून सिडकोला संबंधित एजन्सीला द्यावी लागणार आहे. या निविदेतील अटी शर्तीनुसार संबंधित एजन्सीला आत्तापर्यंत सिडकोने १०७ कोटी रुपये मोबिलायझेशन रक्कम म्हणून दिली आहे. त्यावर सिडकोला १९ कोटी जीएसटीची रक्कमही द्यावी लागली आहे. गत दोन वर्षात एकाही घराची विक्री न करता सल्लागार कंपनीला देण्यात आलेली १०७ कोटींची रक्कम वादात सापडली आहे. तसेच, सल्लागार कंपनीची कामगिरी विचारात घेऊन उर्वरित घरांच्या विक्रीबाबत करारनाम्यानुसार सिडको संचालक मंडळाच्या मान्यतेने उचित निर्णय घेण्यास नगर विकास विभागाने व्यवस्थापकीय संचालकांना सांगितले आहे.
त्यानुसार मंगळवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मे. थॉटट्रेन्स डिझाइन्स प्रा. लि. व हेलिओसमेडियम बाजार प्रा. लि. या सल्लागार कंपनीमार्फत सिडको घरांची विक्री योजना सुरू करण्यास मान्यता घेण्यात आल्याचे सिडकोतील सूत्रांनी सांगितले.