सोने हे अनेकांसाठी नेहमीत सुरक्षित गुंतवणूक राहिली आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भारतात मोठी आहे. सामान्य लोकंच नाही तर श्रीमंत लोकं देखील सोन्यात गुंतवणूक करतात. कारण कठीण काळात तेच कामी येतं. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्याचे भाव स्थिर होते. पण आता अचानक सोन्याच्या भावात वाढ होणं सुरु झालं आहे. सोन्याचे भाव आता ८० हजारांच्या वर जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे लोकं आता सोन्यात गुंतवणूक करत आहेत. पण जर सोन्याची मागणी वाढली तर मग त्याचे भाव ८० हजाराच्या पार जाऊ शकतात. यामागचं कारण काय जाणून घेऊयात.
सोन्याचा भाव सध्या उच्चांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेअर मार्केट पडल्याने लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धासारख्या परिस्थितीचाही यावर परिणाम होऊ शकतो.
जगात सध्या काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या इराण-इस्रायल यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशिया खंडात युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. सध्या जरी फार कमी वाढ झाली असली तरी देखील भविष्यात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण सोन्याची किंमत आताच 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. त्यामुळे आता सोने 80 हजार रुपयांच्या पुढे जाईल की नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोन्याचा भाव जर 80,000 रुपयांच्या पुढे गेला तर यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसू शकतो. याबाबत बाजार विश्लेषक आणि एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी हेड अनुज गुप्ता यांनी म्हटले की, की सोन्याचा भाव 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅम जाण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी 2025 ची वाट पाहावी लागेल. 2024 च्या अखेरीस सोन्याचा भाव 78,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत राहू शकतो.
सोन्याच्या भाव उच्चांकावर
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 76,560 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला आहे. गुरुवारी तो 76,244 रुपयांवर बंद झाला. 26 सप्टेंबर रोजी खुल्या बाजारात 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली होती. भारत सरकारने अलीकडेच सोन्यावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे सोन्याची देशांतर्गत मागणी वाढत आहे. सणासुदीचा काळ सुरु झाल्याने यात आणखी वाढ होऊ शकते. सोन्याचे भाव सध्या उच्चांकावर आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत भाव असाच राहण्याची शक्यता आहे.
चांदीची मागणी ही वाढली
चांदीची मागणी देखील वाढली आहे. चीनने आपली अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठई इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर व्यवसायवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत 93,480 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.