पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा फेरबदल होणार आहेत. आता दोष पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूदवर पडणार आहे. पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार बदलणार आहे. एका वृत्तानुसार, शान मसूदच्या जागी सलमान आगाला कसोटी संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. कसोटी कर्णधार म्हणून मसूदची गेली तीन वर्षे निराशाजनक होती.
डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून शान मसूदने 16 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. या काळात पाकिस्तानला 12 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धचा पराभव हा त्यांचा सलग चौथा पराभव होता.
कसोटी क्रिकेटच्या 150 वर्षांच्या इतिहासात, बांगलादेश, आयर्लंड आणि अफगाणिस्तान वगळता पहिल्या नऊ देशांपैकी शान मसूद हा एकमेव कर्णधार आहे ज्याने पहिले 12 कसोटी सामने गमावले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूदने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना सातत्य राखण्यासाठी त्याला हटवू नये, अशी विनंती केली आहे, मात्र शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघाच्या खराब कामगिरीनंतर नक्वी यांनी त्याला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्याचे मन बनवले आहे.
गेल्या वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या चक्रात पाकिस्तान नवव्या स्थानावर होता. TelecomAsia च्या अहवालानुसार, “नक्वी आता मसूदला कंटाळले आहेत. त्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना असे वाटते की मसूदच्या जागी आगा हे सर्वोत्तम उमेदवार आहेत कारण येत्या काही महिन्यांत वेस्ट इंडिजमध्ये दोन आणि इंग्लंडमध्ये तीन कठीण कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.”
इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तान त्रिनिदादमध्ये दोन कसोटी सामने खेळणार आहे, ज्याची सुरुवात 25 जुलैपासून होणार आहे. इंग्लंडमध्ये पहिली कसोटी लीड्समध्ये 19 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही मसूद फलंदाज म्हणून अपयशी ठरला होता आणि चार डावात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले होते, त्यामुळे संघातील त्याचे स्थान टिकवणे कठीण झाले आहे.
कोचिंग स्टाफमध्ये माजी कर्णधार सर्फराज अहमद हे मुख्य प्रशिक्षक आणि उमर गुल गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. कॅरेबियन दौऱ्यासाठी नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते.
रिपोर्टनुसार, पीसीबी माजी कर्णधार मोहम्मद हाफीजला ‘डायरेक्टर इंटरनॅशनल क्रिकेट’ बनवण्याचाही विचार करत आहे. क्रिकेटचे चांगले वेळापत्रक मिळवण्यासाठी आणि खेळाडूंच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी हा विभाग महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, हाफिजने टेलिकॉम एशियाशी बोलताना सांगितले की, मला अद्याप कोणतीही ऑफर मिळाली नाही, परंतु जर काही ऑफर आली तर तो विचार करेल.
हेही वाचा-
भारताचे कर्णधारपद मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या तो काय म्हणाला











